संध्याकाळचा वेळ स्वैपाकघरातच गेला. दिनकरराव उशिरा आले, सुषमाला पाहून त्यांना सुखद धक्काच बसला. तिच्या तब्बेतीची चौकशी करत त्याने तिला मिठीत घेतलं. थोडा वेळ गप्पा झाल्या, तिने आग्रह केल्यावर दिनकरराव फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेले. फ्रेश होऊन आल्यावर पुन्हा गप्पांना सुरूवात झाली. थोड्या वेळाने तिने पाने वाढायला घेतली. जेवण चांगलं झालेलं, त्याने मुक्तकंठाने तिची स्तुती केली.
जेवण झाल्यावर थोड्याच वेळात तो आडवा झाला. गप्पा-गोष्टी करता करता नेहमीप्रमाणे ती त्याचे पाय चेपत होती, त्यानंतर डोके चेपत असतानाच तो झोपून गेला. त्याचा घोरण्याचा आवाज येताच तिने भांडी आवरुन ठेवली आणि ती समोरच्या बेडवर गेली. पण आज ती बेडवर न झोपता मोठी उशी आणि गादी घेऊन ती आतल्या खोलीत गेली. हळूच दरवाजा लावून घेत तिने खिडक्याही बंद केल्या. लाकडी खिडकीचे एक न एक छिद्र तिने बारकाईने बघून बंद करुन घेतलं.
आज चक्क तिने आतले कपडे स्वतः उतरवून ठेवले. एक मोठ्या गळ्याचा झिरझिरित गाऊन घातला, अंतर्वस्त्रे काहीच घातली नसल्यामुळे तो गाऊनही तिच्या अंगाला चिटकत होता. आडवी पडल्या-पडल्या ती आज त्याच्या येण्याची वाट बघत होती. मध्यरात्र उलटून गेली तरीही तो आलेला नव्हता. सुषमाला खात्री होती, ती झोपल्यानंतर तो आला तर, तिला तो बोलण्याची संधी ही देणार नाही. त्याने शरीराचा ताबा घ्यायच्या आधीच तिला त्याच्याबरोबर बोलायचं होतं. तसा तिने ठाम निश्चयही केलेला.
उठून तिने हळूच दरवाजा उघडला, बाहेर तर शांतता होती आणि दिनकरराव आरामात घोरत होते. ती तिच्या नेहमीच्या झोपण्याच्या ठिकाणी जाऊन परत आली. इतक्यात, तिला तो दर्प आला. ती पटकन खोलीत आली, तिच्या पाठोपाठ तो आल्याची चाहूल तिला लागली. तो दर्प आत आल्यानंतर ती दरवाजा लावायला वळाली. कडीचा आवाजही न करता हळूवार दरवाजा लावता-लावताच ती हळू आवाजात बोलली,
आज पुन्हा मला त्रास द्यायला आलात ना?
शांतता कायमच होती. पण ती निर्धार कायम ठेवून पुढे बोलू लागली…
तुम्ही कोण आहे हे मला माहिती नाही. पण तुमच्या इच्छेनेच येता आणि तुम्हाला हवं ते आणि हवं तसंच करता… माझा थोडा पण विचार करत नाहीत. मला अशी शिक्षा का देत आहात.. आज तूम्ही माझ्या समोर यावं आणि माझ्याशी बोलावं, मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी असं मला वाटतं. त्या नंतर तुम्हाला जे हवंय ते तर तुम्ही करणारच आहे.. अगदी मी कितीही आडवलं तरी, तूम्ही माघार घेणार नाहीत..
थोडा वेळ शांत गेला आणि समोरुन तिला आवाज आला.
हे सुंदरी, माझ्या समोर येण्याने तु घाबरुन जाशील. त्यापेक्षा मी तुला दिसत नाही तेच उत्तम आहे…
तिने दुपारी त्याला बघितलं होतं.. त्यामुळे तिची भिती कमी झालेली. त्याने समोर यावं म्हणून सुषमाने त्याच्याकडे हट्टच केला. मग मात्र त्याचा नाईलाज झाला आणि तो तिच्या समोर प्रकट झाला.
दुपारी त्याला तिने लांबून पाहिलेलं. पण जवळून पाहताच त्याच्याकडे बघून सुषमाला धडकी भरली, ती घाबरली पण थोड्या वेळातच ती त्यातून सावरली…
त्याला जाळ्यात ओढण्यासाठी ती त्याच्याशी गोड आवाजात बोलू लागली..
तुम्हाला माझ्याकडून शरीरसूखच हवंय ना? मी ते तुम्हाला हवं तसं देईन. मी माझं शरीरच तुम्हाला सोपवून देईल. पण त्या आधी मला काही प्रश्न पडलेत आणि माझ्या काही अटी आहेत, त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील…
तो विचारात पडला, थोडा वेळ घेऊन त्याने त्याची बाजू मांडली… अटींमध्ये मला मान्य असेल आणि शक्य असेल ते सगळं मी तुला देईल सुंदरी…
बोल तुला काय हवंय.. पैसा-अडका की सोनं-नाणं? सगळं भौतिक सुख तुझ्या पायाशी आणून ठेवतो…
त्याचं सकारात्मक उत्तर येताच तिची मुद्रा खुलली.. पुढे होत ती त्याला अट सांगू लागली…
मला भौतिक गोष्टींची ओढ आणि लालसा नाही. त्या गोष्टींची गरजही मला वाटत नाही. माझा नवरा जे देतो, त्यामध्ये मी समाधानी आहे. असो..
तुम्हाला माझ्या अटी सांगते..
अट नंबर एक… आपलं बोलणं किंवा आपले संबंध कुणीच बघू शकणार नाही.. असं मला तुमच्याकडून वचन पाहिजे..
क्षणात तो बोलला… मंजूर…
अट नंबर दोन… तुम्ही आल्याबरोबर मला एक दर्प येतो, तो मला अजिबात नकोय.. त्याने मला किळसही येते आणि माझा जीव जणू गुदमरून जातो..
समोरुन गंभीर आवाज आला… मंजूर…
अट नंबर तीन… तुमचा हा चेहरा आणि हे भलमोठं शरीर मला भयावह वाटतं.. तुमची खूप भितीही वाटते, त्यामुळे तुमचा चेहरा आणि तुमचे सगळे अवयव माणसासारखे असावेत आणि दिसावेत असं मला वाटतं…
मंजूर…
अट नंबर चार… तूम्ही माझ्यापर्यंत कसे आलात? हे मला काहीच न लपवता सगळं सांगायचं…ते ही आत्ताच..
मंजूर…
तिच्या एकावर एक अटी तो मंजूर करतच निघाला होता…
पहिल्या अटीसाठी त्याने डोळे झाकले आणि मंत्र पुटपुटले, ती सगळी खोली पांढऱ्या शुभ्र रंगाची दिसू लागली. खोलीमध्ये ना खिडकी दिसत होती ना दरवाजा, संपुर्ण बंद खोली होती. झोपायला येतानाच तिने पांघरूण आणलेले पण याच्या मंत्रोच्चाराने त्या पांघरूणाच्या जागी स्वच्छ आणि सुंदर सफेद बेड लागलेला. मऊ गालिचा सारखी गादी पाहून ती अगदी हरखून गेली.
हे सुंदरी तू खुष आहेस का?
तिने मानेनेच होकार दिला..
दुसऱ्या अटीसाठी त्याने पुन्हा डोळे झाकून मंत्रोच्चार सुरु केले,
त्याचा घाणेरडा दर्प एकाएकी थांबला आणि त्या ऐवजी सुगंधी दरवळ तिला येऊ लागला.. त्या सुगंधाने ती मंत्रमुग्ध होऊन गेली. तो इतका साॅफ्ट होता की, डोळे झाकून ती नाकात भरुन घेऊ लागली. तो तिच्याकडे बघतच राहिला.
तिची तंद्री न मोडता त्याने पुन्हा मंत्र सुरु केले, आणि त्याच्या रूपाचा कायापालट झाला. तिच्या समवयस्क एका सुंदर तरुणात त्याचं रुप बदलून गेलं…
डोळे उघडल्यावर ती जणू त्याच्या प्रेमातच पडली… एकटक ती त्याच्याकडे बघत राहिली…
हे सुंदरी.. या शब्दांनी तिची तंद्री भंग पावली.. तुझ्या चौथ्या अटीचं उत्तर ऐक…
मी विरा आहे. एक क्षत्रिय म्हणून मी जन्माला आलेलो. आजपासून ५०० वर्षांपूर्वी एका युध्दात मला वीरमरण आले. त्यावेळी माझा मृत देह बघून मीच गहिवरून गेलो होतो. कारण इतक्या सुंदर देहाच्या इच्छाच अपूर्ण राहून गेलेल्या. आत्ता माझं जे रुप बघत आहेस तेच रुप मी देहत्याग केला त्यावेळी होतं. माझ्या अपूर्ण इच्छांची पूर्तता जवळपास ५०० वर्षांनी पूर्ण झाली ती ही तुझ्या रुपाने… तारुण्यात माझ्याकडून घडलेल्या चुकीमुळे मला हा श्राप मिळाला आहे, तोच भोगण्यात माझी ५०० वर्षे निघून गेली. अजून ही काही शतकं बाकी आहेत.
आमच्या राज्यातलीच, अगदी तुझ्यासारखीच दिसणारी, सुंदर तरुणी मला आवडत होती. परंतू युद्ध, राज्य, परकीयांचा त्रास या सगळ्यात मी तिला साधं सांगूही शकलो नाही की, तू मला आवडतेस आणि तू मला हवी आहेस..
इतक्या वर्षांच्या खंडानंतर रमाबाईने काळ्या विद्येने तिने मला जागृत केले. आणि तिची इच्छा अशी होती की…
क्षणभर तो बोलताना थांबला..
बोलत रहा, थांबू नका.. ती त्याच्या डोळ्यात पाहून बोलली.
तिची अशी इच्छा होती की, तुला संभोगात मरणयातना देऊन त्यातच तुझं आयुष्य संपवावं…
हे ऐकून सुषमाच्या डोळ्यातच पाणी आलं.. भावनिक होऊन ती त्याच्याशी बोलू लागली…
मी तर काकूला आईच्या जागी मानत होते आणि काकूंचे माझ्याबद्दल किती वाईट विचार आहेत. त्यांना वाटतं की, मी त्यांच्या नवऱ्याला आणि मुलाला माझ्या नादाला लावते, त्यांच्याकडून पैसे काढते. पण मला पैशाची कमतरता नाहीच मुळी आणि दुसरी गोष्ट, माझ्या नवऱ्याला सोडून कुणाशीच मी संबंध ठेवले नाहीत किंवा असल्या गोष्टी माझ्या मनालाही स्पर्श करत नाहीत. आजपासून मागे वर्षभरात आम्हा नवरा-बायकोंमध्ये बोटावर मोजण्याइतपतच संबंध आले असतील. पण म्हणून माझी नियत कधीच फिरली नाही. मनात आणलं असतं तर हव्या त्या पुरूषाला मी वश केलं असतं. पण माझ्या गरजेसाठी व्यभिचार करायचा विचार देखील मी केला नाही..
गरजा एकवेळ पूर्ण होतील, पण हव्यास कसा पूर्ण करणार?.. जसं की काकूला पैशांचाच हव्यास आहे. ती खूप खालच्या पातळीला जाऊन विचार करते, आणि समोरची व्यक्ती सुध्दा तिच्यासारखीच विचार करत असेल असं तिला वाटतं.
माझी काहीच चूक नसताना, मी हे का भोगत राहू विरा, तुम्हीच मला उत्तर द्या?
आजपर्यंत मी माझ्या नवऱ्याला कधीच फसवलं नाही किंबहुना माझ्या मनात तसला विचारही आला नाही. तुम्ही दोन दिवस जे केलंत ती जबरदस्ती होती.. माझ्या मनाविरूद्ध माझा आणि माझ्या भावनांचा तुम्ही केलेला बलात्कार होता.. पाशवी बलात्कार… असं म्हणून तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी ओघळलं..
हे पाहून विराचं काळीज पिळवटून गेलं.. तिच्याकडे पाहून तो गंभीरपणे बोलू लागला…
हे सुंदरी, मला माफ कर.. तुला पहिल्याच भेटीत मारण्याचा आदेश मला दिलेला होता. त्या आदेशाने मी तुला मारलंही असतं. परंतू तुझ्यात मला तिचंच रुप दिसलं अन मी रमाबाईचं वचन मोडीत काढलं. मी वचन देऊन जर मोडलं तर माझी या योनीतली १०० वर्ष अजून वाढतात. पण त्याची पर्वा मी केली नाही. कारण मला तू हवी होतीस..समोर उभी राहून रमाबाई आपला संभोग बघत होती पण माझं बदललेलं मत तिच्या लक्षात येऊ नये म्हणून मी तुला यातना दिल्या आणि तुझे हाल केले… त्या बद्दल मी तुझा क्षमाप्रार्थी आहे… असं म्हणून त्याने हात जोडले.
असं बळजबरीनं तुम्ही मला मिळवाल असं वाटतं का तुम्हाला? मी तर म्हणेन की, मला न मारण्यापाठी तुमचा स्वार्थच आहे, माझ्याकडून शरीरसुखाच्या अपेक्षेनेच तुम्ही मला जिवंत ठेवलं आहे… तुमच्या श्रापात मी वाटेकरी का होऊ? ५०० वर्षांपूर्वी तुम्ही चूक केली त्याची शिक्षा तुम्ही मला का देत आहात? ती त्याच्या डोळ्यात बघून बोलली…
हे सुंदरी, तू मला आवडणाऱ्या त्या मुलीसारखीच आहेस, त्यामुळे माझं जिवापाड प्रेम असणाऱ्या व्यक्तीला मी कसं मारु शकतो?
तुझ्या बाकीच्या प्रश्नांचं उत्तर माझ्याकडे नाहीत. मला रमाबाईने जागं केलं आणि तुझ्याकडे पाठवलं. तुझ्या घराच्या छतावर तिने मला ठेवलं आहे. म्हणजे हे माझं घर झालं आहे. मी ह्या घरात मध्यरात्रीनंतर कधीही प्रवेश करु शकतो. आणि तू जर तयार नसशील तर मी बळजबरी करुनही आयुष्यभर तुझ्याशी संबंध ठेऊ शकतो…
तिला विराच्या या शब्दांचा राग आला, रागाने तिचे डोळे लाल झाले आणि निर्धाराने ती बोलली… असं असेल तर मीच स्वतःला संपवून घेते. म्हणजे तुमचं वचनही मोडणार नाही, तुमची १०० वर्षे पण वाढणार नाहीत आणि तुमच्या रमाबाईंचा तुमच्यावर विश्वास कायम राहील.
हे सुंदरी, तुझ्यासोबत जबरदस्ती संबंध ठेऊ शकतो असे म्हटले मी. ठेवणारच असे म्हटले नाही. त्या गोष्टीत आता मला संकोच वाटतो.. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नको…
का? गेल्या दोन दिवसात तर मला मरणयातनाच दिल्याच की…शिवाय आजही तेच करायचं होतं तुम्हाला… त्यासाठीच तर आलात ना?
हे सुंदरी.. त्याचे कारण मी तुला सांगितले आहे. शिवाय माझा हा जवळपास ५०० वर्षांचा उपास होता. मी कितीही स्वतःला आडवण्याचा प्रयत्न केला तरी तुझ्या सौंदर्यावर मी भाळलो आहे, मला क्षणाक्षणाला तुझी आठवण सतावत असते. परंतु, मध्यरात्र झाल्याशिवाय मी बाहेर पडू शकत नाही. आणि आज मी तुला फक्त बघायला आलेलो. मला काही करायचंच असतं तर तुझं बोलणं मी ऐकूनही घेतलं नसतं.
हे सुंदरी, तुझी इच्छा असेल तर, आयुष्यभर ही मी तुझा गुलाम बनून रहायला तयार आहे… तुझ्यासाठी जगातली कोणतीही गोष्ट तुझ्या पायाशी आणायला मी तयार आहे..
विराचं बोलणं ऐकून सुषमाला अंदाज आलेला. तो पूर्ण आपल्या वश मध्ये आला आहे, याची तिला खात्री झालेली. त्याच्या डोळ्यात पाहून ती बोलू लागली.
अजूनही माझ्या अटी संपल्या नाहीत विरा..
बोल सुंदरी.. तुला काय हवंय..
मला जसा त्रास झाला, तसाच त्रास रमाकाकूला होताना मला बघायचं आहे.. मला संपवून तिला जो आसुरी आनंद मिळवायचा होता, त्याचा मला सूड घ्यायचा आहे. शक्य झाल्यास तिला होणारा त्रास मला माझ्या डोळ्यांनी बघायला आवडेल…
मंजूर सुंदरी.. आपण आत्ताही ते करु शकतो.
लगेच चला…
तिचा आदेश मिळताच विराने तिचा हात पकडला. क्षणात दोघे अदृष्य झाले आणि थेट रमाकाकू जवळ ते उभे होते.
(क्रमशः)